कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही’-पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई, २८ जून : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.शिंदे हे आपल्यासोबत ५० आमदार असल्याचा दावा करत आहे. पण आा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काही बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत, आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदार संपर्कात असल्याचा दावा करत आहे. आता त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन करत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
‘आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही’अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना घातली आहे.
‘माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू ‘ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.त्यामुळे आता बंडखोरी करून गेलेले सर्व आमदार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे