ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

सात मंत्र्यांचे मंत्रीपदे बरखास्त होतील: २४ तासात होणार कारवाई-खा राऊत

मुंबई : शिवसेनेच्या ३८ आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे ते आमदार सूरतमार्गे आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेकडून बंडखोर आमदार आणि मंत्री यांच्या विरोधात कारवाईचं सत्र सुरु करण्यात आलं आहे. १६ आमदारांची आमदारकी रदद् करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आता मंत्र्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला यासंदर्भातील पत्र पाठवली जाणार असल्याची माहिती कळतेय.

मुख्यमंत्री कार्यालय राज्यपालांना पत्र पाठवणार
महाराष्ट्राच्या ७ मंत्र्यांना बरखास्त करण्यात यावं, असं पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला पाठवलं जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद बरखास्त करण्यासाठी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिलं जाईल, अशी माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. जे लोक गेले आहेत त्यांच्यावर येत्या २४ तासात कारवाई केली जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

शिवसेनेकडून कारवाईला सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या तालुकाप्रमुख, जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांची बैठक घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांबाबत आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेनं काल रात्री १६ आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानभवनात कायदेतज्ज्ञांसह तळ ठोकला होता. आज विधानसभा उपाध्यक्षांनी आज सेनेच्या १६ आमदारांना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

१६ आमदार काय भूमिका घेणार?
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर,रमेश बोरणारे या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आलेल्या कारवाईला आमदारांकडून कोर्टात आव्हानं दिलं जाण्याची शक्यता आहे.(साभार-म टा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *