ऑनलाइन वृत्तसेवा

महाराष्ट्रातल्या दहा विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर:20 जूनला निवडणूक

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीने वातावरण तापलं असताना आता विधान परिषदेच्याही निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडणार असल्याचे आज जाहीर करण्यात आलंय.

20 जूनला या 10 जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. आहे.

विधान परिषदेचे 10 सदस्य जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त होत आहेत. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे चार तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तर कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र दहाव्या जागेसाठी कॉंग्रेसला मतांची गरज असून या जागेसाठी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दौंड, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होणार आहे. तर भाजपचे रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे. मात्र यंदा भाजपचे दोन सदस्य कमी होणार आहेत. यामुळे भाजपकडून कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहे. त्यामुळे भाजपच्या सहज चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळेच आता या चार जागांसाठी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे 54, शिवसेना 56 आणि कॉंग्रेसचे 45 आमदार आहेत. विधानपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे.
एकीकडे प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपच्या वरिष्ठांकडून चार जागेसाठी कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *