यंदा आषाढीवारी उत्साहात:कसं असणार पंढरपूरात पालखी सोहळ्याचं नियोजन?
येत्या आषाढी वारीच्यानिमित्ताने संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या २० जूनला देहूतून तर २१ जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी तिथी-वाढ असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर येथे एक मुक्काम वाढेल, तसेच आंथुर्णे येथेही यंदा पालखी मुक्कामी असेल अशी माहिती पालखी सोहळा समितीतर्फे देण्यात आली आहे. गेली २ वर्षे करोना महामारीच्या बांधनांनंतर सर्व संतांचे पालखी सोहळे यावर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत.
संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. संतोष (महाराज) मोरे, माणिक (महाराज) मोरे आणि विशाल (महाराज) मोरे यांची पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी निवडी झाल्या आहेत. येत्या १० जुलैला पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा होत आहे. त्याकरिता २० जून म्हणजे ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूच्या इनामदारवाडा येथून प्रस्थान करेल. या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत ३२९ दिंड्या आहेत.
मोकळ्या दिंड्यांची संख्या २०० पेक्षा अधिक आहेत, तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २१ जूनला आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. कोरोनांतर यांच्या आषाढी यात्रेचा वारकऱ्यांत उत्साहात पाहायला मिळत आहे.त्यामुळं संभाव्य गर्दी लक्षांत घेऊन प्रशासनाने नियोजनात फेरबदल केले आहेत.
यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून, या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना पालखी मार्गावर, पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत. सोलापूरात पालखी सोहळ्याचे आगमन ४ व ५ जुलै रोजी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्ग व विविध पालखी तळांची पाहणी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.