शिवसेना हिंदुत्ववादी आहेच,भोंगेधारी,पुंगीधारी खूप बघितले-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई,01 मे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. कोरोनामुळे 2 वर्षे नाटक, चित्रपट बंद होते. आता फुकटात करमणूक मिळत असेल, तर का नको? अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
दोन वर्षांचा कालखंड फार मोठा होता. यादरम्यान सर्व बंद होतं. मग करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. लोकसत्तेने घेतलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
मी शिवेसनेची ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे हे मी विधानसभेतही बोललो आहे आणि ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करुन बघू ते करुन बघू बोलत आहेत. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. नाही आवडलं तर परत करा. तसंच हे फळलं तर ठीक नाही तर परत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली. असे भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे.
हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. यांच्याकडून कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ केला जात आहे. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. असे खेळ खूप पाहिलेत, असे खेळ करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
अशा खेळाडुंकडे मी लक्ष देत नाही, हे खेळाडू नेमक्या कोणत्या-कोणत्या मैदानैत कोणते-कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.