ओबीसी आरक्षण बाबत महत्वाचा निर्णय:अधिक गुण असलेल्या उमेदवाराला ओपन जागेवर नियुक्ती मिळणार
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षणाबाबत मोठा निकाल देण्यात आलाय.
सरकारी नोकरीत जर राखीव कोट्यातील उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण असतील तर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराच्या जागी राखीव (अधिक गुण मिळालेल्या) प्रवर्गातील उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावं. राखीव मधील ‘गुणवंत’ उमेदवार खुल्या प्रवर्गातील (त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या) उमेदवाराच्या जागेचा हकदार ठरतो असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आलाय. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील रिक्त झालेल्या जागांवर त्याच प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त करण्यात यावं असा निर्णयसुद्धा न्यायालयाने दिलाय.
टेक्निकल असिस्टंट पदासाठी बीएसएनएलकडून परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारापेक्षा ओबीसी प्रवर्गातील दोन उमेदवारांनी जास्त गुण मिळवले. त्यांना खुल्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र ठरवलं गेलं मात्र त्यांच्या रिक्त झालेल्या राखीव प्रवर्गातील जागा तशाच रिक्त ठेवण्यात आल्या. एका ओबीसी उमेदवाराने याच संदर्भात ‘कॅट’ कडे दाद मागितली. त्या रिक्त जागांवर राखीव प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार करण्यात यावा अशी त्याने विनंती केली.
‘कॅट’ने उमेदवाराची विनंती ऐकत बीएसएनएल ला रिक्त जागांवर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त करण्याचे आदेश दिले. आदेशाला बीएसएनएलने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले, राजस्थान उच्च न्यायालयानं ‘कॅट’चा निर्णय वैध ठरवला. बीएसएनएलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने बीएसएनएलचे अपील फेटाळून लावले. त्या रिक्त जागेवर राखीव प्रवर्गातील पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.