दुकानांची नावे मराठी भाषेत लिहीण्याच्या सूचना:दुकानदारांनो नामफलक बदला
बीड, दि. 28 (जि. मा. का.): महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे) अधिनियम, 2015 दि. 17.03.2022 च्या अधिसूचनेव्दारे सुधारणा करण्यात आलेली असून कलम 36 क (1) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे त्या प्रत्येक नियोक्तयाकडे आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असेल.
अशा आस्थापनेच्या नियोक्तयाकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड- किल्ल्यांची नावे लिहिणार नाहीत.
तरी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 मधील व नमूद सुधारणा विचारात घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालक यांनी त्यांची दुकाने व आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असतील, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी , बीड यांनी केले आहे.