अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू;पसंतीक्रमानुसार नियुक्त्या
करोनामुळे मागील दोन वर्षांत शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याच झालेल्या नाहीत. यामुळे आताच्या बदली हंगामात त्या निश्चितच होणार आहेत. यादृष्टीने शिक्षण विभागाने बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून पसंती मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे गट ब’चे अधिकारी तसेच गट क’, ड’ मधील कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण लागू केले आहे. त्यानुसार रिक्त पदांची यादी व बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रामुख्याने उपशिक्षणाधिकारी, अधिक्षक, अधिव्याख्याता यांच्या बदल्या होणार आहेत. बदलीपात्र अधिकाऱ्यांनी पसंतीक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तालयात येत्या 8 एप्रिलपर्यंत सादर करावी लागणार आहे. शिक्षण आयुक्तालयाने पसंतीक्रमासह एकत्रित माहिती 13 एप्रिलला शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.
गट ब’मधील ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी विनंती अर्ज सादर केले आहेत. ते अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. मुदतीत पसंतीक्रमाची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या रिक्त पद भरण्याच्या निकडीनुसार पदस्थापना दिली जाणार आहे. हे संबंधित अधिकारी पदस्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मुदतपूर्व बदलीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांनी विनंती अर्ज सादर केल्यास ते विचारातही घेतले जाणार नाहीत.
जे अधिकारी प्राधान्यक्रम नमूद करतील त्यांनी त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले प्रमाणपत्र व कागदपत्रांचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. पुरावे जोडले नसल्यास अधिकाऱ्यांचे प्राधान्यक्रमही विचारात घेतले जाणार नाहीत. पसंतीचे क्रम नमूद करताना संबंधित अधिकाऱ्यास महसूल विभाग वाटप नियम लागू असल्यास अशा अधिकाऱ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महसूल विभागातील रिक्त पदे विचारात घेवून पसंतीक्रम सादर करावे लागणार आहे. ज्या बदलीपात्र अधिकाऱ्यांना महसूली विभाग वाटप नियम लागू आहे अशा अधिकाऱ्यांना त्यांना वाटप केलेल्या महसूली विभागाबाहेरची पसंती दिल्यास ती विचारात घेतली जाणार नाही, असे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.