राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर: 2 मे पासून 12 जूनपर्यंत सुट्ट्या
राज्यातील शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यातील शाळांना (Maharashtra School) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी 12 जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरु होणार आहे. मात्र विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता 27 जून पासून सुरु होणार आहे.
उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करुन या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्यावेळेस देता येणार आहेत. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहेत. मात्र या सुट्टया देताना त्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिलेत.
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालकवर्ग काहीसा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर शिक्षणविभागाने हा निर्णय घेतला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी शाळा सुरू करण्यात येणार आहे. जर सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस असेल त्या दिवसापासून शाळा सुरू करण्यात येणार आहे.
पहिली ते बारावी अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात
ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.