अनाथ उपेक्षित मुलींसाठी पुण्यात उभारते आहे शांतीवनचे मानवतेचे मंदिर:मदतीचे आवाहन
माझ्या मुलींच्या शिक्षणाची आता हेळसांड होणार नाही ..पुण्यात हक्काचं घर होतय-दिपक नागरगोजे
बऱ्याच दिवसांपासून एक अडचण मनात कायम सल करीत होती. शांतिवन मधुन दहावी बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पुण्यात येणाऱ्या अनाथ , वंचित उपेक्षित असणाऱ्या माझ्या मुलींसाठी हक्काचं घर असावं हे स्वप्न मनात होतं. मुलींनी खुप शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं हे सुरुवातीपासूनच मला वाटायचं. शांतिवनच प्रत्येक मुल एक प्रकल्प समजुन जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत तिच्या पाठीशी उभे राहायचे ही आपल्या कामाची पद्धत. त्यासाठी मग कुठलेतरी ज्याच्यात्याच्या क्षमतेनुसार व्यावसायिक शिक्षण देणे आलेच. या शिक्षणाची सोय बीड सारख्या ग्रामीण भागात होणे कठीण. मग २०१३ पासून या मुलांना पुणे आणि इतर काही शहरात शिक्षणासाठी आम्ही ठेऊ लागलो. त्यात स्वाभाविकच पुण्यात राहणाऱ्या मुलांची संख्या जास्त. या लेकरांना पुण्यात प्रवेश मिळउन देणं खुप जिकरीचे काम. पन्नास ठिकाणी पायपीट केल्यानंतर कुठेतरी काम होते . त्यात इकडून तिकडून प्रवेश मिळाला तर राहण्याची आणि खाण्याची अडचण. वस्तीगृहाच्या प्रचंड फि पाहता अगोदरच कॉलेज प्रवेश फी भरुन दमलेलो आम्ही यासाठी पुन्हा देणगीदार शोधण्यासाठी भटकत राहतो. त्यात मुलींच्या प्रवेशाची आणि निवासाची प्रचंड अडचण. पण या कामात पुण्यातील अनेक संस्थाचालक आणि वसतिगृह चालकांनी आम्हाला मदत केली. म्हणून हे काम होत गेले.आणि कित्येक मुलींचे मुलांचे शिक्षण होऊन त्यांचे समाजात व्यवस्थित पुनर्वसन करण्यात आम्ही यशस्वी झालो. पण या सर्व धावपळीत पैसे जमवताना आणि लेकरांना सांभाळताना जो त्रास होतो त्याचे वर्णन शब्दात करणे सुध्दा कठीण आहे. प्रत्येक लेकराची वेगळी निवास आणि खानावळीची फी भरणे आणि तीही प्रचंड मोठी हे कुठ्ल्याही सामाजिक संस्थेच्या आवाक्या बाहेरचेच असते. आणि त्यात आपली ग्रामीण भागातली संस्था कुठ्ल्याही मोठ्या कंपन्या किंवा मोठ मोठे देणगीदार मागे उभे नाहीत . निधी जमा करणारे आणि फडफड इंग्रजी बोलणारे प्रशिक्षित कार्यकर्ते नाहीत . परदेशात संबंध नाहीत या सर्व गोष्टीची उणीव. जेम तेम कार्यकर्त्यांना घेऊन काम करताना निधी जमा करण्याची जबाबदारी आम्हा दोघा तिघावरच. या अश्या प्रतिकुल परिस्थितीत शांतिवन ची जबाबदारी सांभाळुन पुन्हा या कामासाठी पैसा उभा करणे म्हणजे मोठे कठीण काम. पण तुम्हा सर्वांच्या सहकार्याने ते आजपर्यंत होत आले याचे सर्व श्रेय तुम्हा सर्व पाठिराख्याना आहे. ही सर्व धावपळ करीत असताना पुण्यात आपल्या लेकरासाठी हक्काचं घर असावं हे स्वप्न कायम मनात घर करून होत. ज्यामुळे सर्व लेकरं एका छताखाली येतील .
एका स्वयंपाक घरात बनलेले अन्न खातील. प्रत्येकाची वेगळी फी भरावी लागणार नाही आणि निवास आणि जेवणाची व्यवस्था झाल्यामुळे आपसूकच खर्च खुपच कमी होईल. हे सर्व फायदे दिसत होते. त्यातच दोन वर्षापूर्वी एक इमारत भाड्याने घेऊन इथे मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. आज ५० मुलांच्या उच्च शिक्षणाची येथे व्यवस्था झाली आहे. पण मुलींसाठी प्रयत्न करणे गरजेचे होते आणि त्याची गरजही जास्त होती. जेणेकरून आणखी जास्त मुलींना आपण उच्च शिक्षण देऊ शकू. मग त्यासाठी जागा बघणे सुरू केले. पुण्यात जागेच्या किमती आभाळाला भिडलेल्या. पण अशातच खुप शोधाशोध केल्यानंतर वाघोलितील मित्र गणेश सातव आणि काही मित्रांनी जागा दाखवली. जागा मोक्यावर , मोठा रस्ता आजूबाजूला उंच उंच इमारतीचा गजबजलेला परिसर. पी. एम. टी. स्टेशन आणि उद्या येणारी मेट्रोचे नियोजित स्टेशन हाकेच्या अंतरावर . मुलींच्या प्रवासाच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशीच जागा मला हवी होती. सुरेश जोशी काका , विजय जोशी काका , रमेश एरंडे , विजय काका ठाकूर , मिलींदकाका वैद्य , नरेंद्र मेस्त्री काका , श्रीधर जोशी या मार्गदर्शकांना जागा दाखवली . त्या सर्वानाच ती आवडली . आणि त्यात वाघोली आता व्यवसायिक शिक्षणाचे मोठे केंद्र म्हणुनही समोर येत आहे . ५० पेक्षा जास्त कॉलेज या परिसरात उभे राहिले आहेत. आणि पुण्यातील कुठ्ल्याही कॉलेज ला सहज पोहोचता येईल अशी साधनेही इथे उपलब्ध असल्याने सर्वच दृष्टिकोनातून ही जागा योग्य होती .पण किंमत खुप. जवळ पैसे नाहीत. काही किंमत कमी करून घेतली मग घरचा तालुक्याच्या ठिकाणी कधीकाळी घेतलेला एक प्लॉट होता. तो विकला आणि काही मित्रांची मदत घेऊन ही जागा खरेदी केली. जागेचे काम झाले पुढे बांधकामाचे काय मग ठरवले सुरू तर करू कुणी वीट देईल , कुणी लोखंड , कुणी सिमेंट … हळू हळू बांधकाम होऊन जाईल . अनुश्री ताई भिडे यांना ही कल्पना सांगितली आणि त्यांनी मदत करण्याचा शब्द दिला. मोठा आधार वाटला…हळू हळू मदत जमा होऊ लागली … काम सुरू झाले. परवा या इमारतीचा पहिला स्लॅब टाकण्यात आलाय. हळू हळू हे घर पूर्णत्वाकडे जात आहे.. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि योगदानाने एक सुंदर घर तयार होईल जे अनाथ उपेक्षित असलेल्या आपल्या २०० मुलींच्या पुनर्वसनाचे एक केंद्र होईल. त्यांच्या मायेचं आणि हक्काचं घर….! या घरासाठी आपणही जरूर आपले योगदान द्यावे…. इतकेच द्यावे असा आग्रह नाही …. अगदी एक वीट , एक पोते सिमेंट एव्हढे सुध्धा चालेल…अनाथ उपेक्षित मुलींच्या उद्धारासाठी चाललेल्या या यज्ञात तुमची समिधा म्हणुन मला ती हवी आहे. तुमची ही मदत मानवतेचे मंदिर उभे करण्यासाठी खुप मोठी भुमिका निभावेल… तुम्ही या आणि या उपक्रमाला जरूर भेट द्या.. असे आवाहन दिपक नागरगोजे शांतिवन, बीड. 9923772694 यांनी केले आहे