बीड जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाचे राज्य मार्गात तर ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नत
मुंबई, दि. ९ : राज्यातील काही रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेता परभणी, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग हे राज्य मार्गात तर ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नत करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्यांच्या दर्जोन्नतीला मान्यता दिली असून त्याचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
या मार्गावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेऊन मार्गांचा दर्जा वाढविण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मार्ग २५३ पासून ढेंगळी पिंपळगाव-झोडगाव- तिडी-पिंपळगाव गुळी धामणगाव, राज्य मार्ग २२१ देऊळगाव गात डासाळा ते जिल्हा सरहद्द रस्ता हा सुमारे २७.७०० कि.मी. चा प्रमुख जिल्हा मार्ग २७ रस्ता दर्जोन्नत करण्यात आला असून तो आता राज्य मार्ग ४३२ या क्रमांकाने ओळखला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील पिंपरी बु. ग्रामीण मार्ग ३९ पासून ते सेलू राज्य मार्ग २२१ पर्यंतचा ५ कि.मी. लांबीचा रस्ता ग्रामीण मार्ग -१३६ या नावाने दर्जोन्नत करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६१ गंगामसला-आडोळा-सोमठाणा-छत्रबोरगाव-आळसेवाडी-मंजरथ-आबुजवाडी सादोळा- पुरुषोत्तमपुरी-महातपुरी-डुब्बाथडी- काळेगावथडी-हिवरा (बु.), कवडगाव थडी-गव्हाणथडी- सुर्डी- नजिक राज्य महामार्ग ५० पर्यंतचा रस्ता हा इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्गाचा भाग असून हा ५३.१०० कि.मी. लांबींचा रस्ता आता प्रमुख जिल्हा मार्ग ७७ मध्ये दर्जोन्नत करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्हातील प्रमुख जिल्हा मार्ग ५३ पासून गाडीवाट-गाजीपूर-लाखेगाव-नांदलगाव-काटगाव-धुपखेडा-दिन्नपूर-जळगाव- ७४-ढाकेफळ- मुलानी वाडगाव-शेवता हा १३.५०० कि.मी. चा इतर जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग १२५ मध्ये दर्जोन्नत करण्यात आला आहे. पाचोड लिंबगाव-हर्षी-सोनवाडी- प्रमुख जिल्हा मार्ग- ३६-पारुंडी तांडा आडुळ-मुमराबाद हा १३ कि.मी. चा इतर जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग १२६ म्हणून दर्जोन्नत करण्यात आला आहे.