बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून मनाई आदेश लागू-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बीड : बीड जिल्ह्यामध्ये 24 फेब्रुवारीपर्यंत मोर्चा आंदोलनावर बंदी असणार आहे. एवढेच नाही तर पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येण्यावर मनाई करण्यात आली आहे.सामाजिक शांतता अबाधित राहावी म्हणूनच बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे..
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात शास्त्र बाळगणे,आंदोलन, मोर्चे काढणे,भडकावू भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकूणच सध्या घडणाऱ्या घटना आणि घडामोडीमुळे सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणूनच बीडच्या जिल्हा प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत.
10 ते 24 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3)नुसार प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. या काळात कोणीही व्यक्ती शस्त्र, काठी, तलवार,बंदूक जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही शस्त्र,दाहक पदार्थ जवळ बाळगणार नाहीत .दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे करणार नाहीत. आंदोलन,मोर्चे करता येणार नाहीत. यासह विविध आदेश दिले आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष बनकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश मोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडण्याची किंवा फेकण्याची उपकरणे किंवा साधे गोळा करून ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत. भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल. ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगणार नाहीत. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल. जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करण्यास मनाई असेल. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समोवश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/ मोर्चा काढता येणार नाही.