लता दीदींवर सायंकाळी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. आज सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभू कुंज या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थीव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे.
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. आज देशात जी पोकळी निर्माण झाली आहे कधीच भरुन येऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र माेदी (prime minsiter narendra modi) यांनी लता मंगेशकर यांना अदारांजली वाहिली आहे.
नरेंद्र माेदी म्हणाले लता दीदींच्या गाण्यांनी विविध प्रकारच्या भावना प्रकट केल्या. त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्या नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल उत्कट असायच्या. त्यांनी नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. माेदी पुंढ म्हणतात लता दीदींकडून मला नेहमीच अपार स्नेह मिळाला हा मी माझा सन्मान समजतो. माझा त्यांच्याशी झालेला संवाद अविस्मरणीय राहील.
लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeary) यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.