बीड

अहमदनगर ते बीड ते परळी रेल्वेमार्गासाठी ५६७ कोटी रुपयांची तरतूद

महाराष्ट्राला विविध रेल्वे प्रकल्प व कामांसाठी एकूण ११ हजार ९०३ कोटी

अहमदनगर ते बीड ते परळी वैजनाथ या २५० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेच्या कामासाठी ५६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या कामासाठी २५० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले होते. ही मार्गिका महत्त्वाची असून ती बनल्यास अहमदनगर व बीड जिल्ह्याचा अधिक संपर्क वाढेल. या मार्गाचे काम गतीने सुरू आहे. या महत्त्वाच्या मार्गावरील उंच पुलाचे २०२० काम सालापासून हाती घेण्यात आले. वर्धा ते नांदेड (व्हाया यवतमाळ-पुसद) या २७० किलोमीटरच्या नवीन मार्गिकेलाही ८२० कोटी रुपये मिळाले असून चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ३४७ कोटी रुपये निधी मिळाल्याने मध्य रेल्वेला प्रकल्पाचे पुढील काम करण्यास मदत मिळाली होती. यंदा त्यात वाढ केली आहे. वर्धा ते यवतमाळ या ७८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाकरिता ४८.४८ हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावयाची आहे. अर्थसंकल्पातून यंदा पुणे ते मिरज ते लोंढा ४६७ किलोमीटर दुहेरीकरणासाठी १ हजार ५६७ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण गेल्या वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

सोलापूर ते उस्मानाबाद व्हाया तुळजापूर नवीन मार्गिकेसाठी दहा कोटी रुपये, कल्याण ते मुरबाड व्हाया उल्हासनगर पाच कोटी रुपये, धुळे ते नदार्ना ५० कोटी रुपये, वर्धा ते नागपूर तिसरी मार्गिका ८७ कोटी, वर्धा ते बल्लारशहा तिसरी मार्गिका ३०५ कोटी रुपये, इटारसी ते नागपूर ६१० कोटी रुपये, दौंड ते मनमाड दुहेरीकरण ५०० कोटी रुपये, वर्धा ते नागपूर चौथी मार्गिका १३० कोटी रुपये, मनमाड ते जळगाव तिसरी मार्गिका २०५ कोटी रुपये, जळगाव ते भुसावळ चौथी मार्गिका ५५ कोटी रुपये.

कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी १६० कोटी रुपये

गेल्या वर्षी अर्थसंकल्पात १६८ कोटी रुपये निधींची भर कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी पडली होती. या मार्गिकेसाठी लागणाऱ्या ३७ हेक्टर भूसंपादनाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून मार्गिकेचे काम गेली पाच वर्षे रखडले आहे. कल्याण ते कसारा दरम्यान सध्या दोन मार्गिका असून त्यावरून लोकल गाड्या व एक्स्प्रेस धावतात. परंतु या सेवांचे वेळापत्रक दोनच मार्गिकांवरून सुरळीत ठेवताना रेल्वे प्रशासनाच्या नाकीनऊ येतात. लोकल विस्कळीत झाल्यास पर्यायी मार्गिकाही नसल्याने मध्य रेल्वेने कल्याण ते कसारा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये अर्थसंकल्पात तिसऱ्या मार्गिकेला मंजुरी मिळाली होती. मात्र अद्यापही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठी १६० कोटी रुपये दिले असून कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विविध प्रकल्पांसाठी ११,९०३ कोटी

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला विविध रेल्वे प्रकल्प व कामांसाठी एकूण ११ हजार ९०३ कोटी रुपये निधी मिळाला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत एकूण १ हजार १७१ कोटी रुपये मिळाले होते. ९१६ टक्क्यांनी निधीत वाढ केल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. यंदा अर्थसंकल्पात मिळालेल्या एकूण निधीपैकी मध्य रेल्वेला ७ हजार २५१ कोटी रुपये मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *