फेकाफेक करून आणि खोटं बोलून राज्याचं भलं होणार नाही-फडणवीस
मुंबई: केंद्र सरकारडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावे महाआघाडीने पत्रकार परिषद घेऊन खोडून काढल्यानंतर फडणवीस यांनीही तात्काळ पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. राज्य सरकारच अभासी आकडे दाखवत आहे. फेकाफेक करून आणि खोटं बोलून राज्याचं भलं होणार नाही. महाराष्ट्राचा मित्र कोण? आणि शत्रू कोण? हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून मिळालेल्या मदतीची जंत्रीच सादर केली होती. एवढी मदत करूनही राज्य सरकार काहीच करताना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. महाविकास आघाडीचे नेते अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्या दाव्यांची चिरफाड केली होती. फडणवीसांनी अभासी आकडे दाखवण्याचा काल प्रयत्न केला. केंद्राकडे राज्याचा ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून हा निधी अद्यापही आम्हाला मिळालेला नाही, असा दावा महाआघाडीच्या नेत्यांनी केला होता.