करोना लस घेतलेल्यांनाच पेट्रोल,रेशन; या जिल्हा प्रशासनाचा आदेश
औरंगाबाद – जिल्ह्यातील ज्या नागरीकांनी करोना लसीचा किमान एक तरी डोस घेतला आहे अशा नागरीकांनाच आता रेशन, गॅस, आणि पेट्रोल दिले जावे असा आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे.
औरंगाबाद मध्ये लसीकरणाचे प्रमाण अन्य जिल्हंच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याचा क्रमांक 26 वा लागला आहे.
राज्यातील लसीकरणाची सरासरी 74 टक्के असताना औरंगाबाद मध्ये ती मात्र केवळ 55 टक्के इतकीच आहे. नागरीकांसाठीचा हा आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल रात्री जारी केला.
या आदेशाची नीट अंमलबजावणी केली नाही तर संबंधीतांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. लसींचा एकही डोस न घेतलेल्या व्यक्तींना जिल्ह्यातील एकाही ऐतिहासिक स्थळात प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने या आधीच घेतला आहे.