आरोग्य विभागातील विविध पदांच्या लेखी परीक्षा 24 ऑक्टोबरला होणार
पुणे -आरोग्य विभागातील विविध पदांच्या लेखी परीक्षा 24 ऑक्टोबरला होणार आहेत. यात आता कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी स्पष्ट केले. यामध्ये उमेदवारांना चॉइस देण्यात नसल्याने कोणावरही अन्याय होण्याचा प्रश्न नाही.
या परीक्षा दि. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी होणार होत्या. मात्र, ऐनवेळी म्हणजे आदल्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता आणि काही उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता मेसेज पाठवून परीक्षा रद्द झाल्याचे कळवण्यात आले.
त्यामुळे दुर्गम, ग्रामीण भागात परीक्षेसाठी मजल दरमजल करत पोहोचलेल्या उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला; मात्र येत्या 24 तारखेला या परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्राबाबत आणि एखाद्या उमेदवाराला जास्त पदांसाठी परीक्षा द्यायची असेल तर चॉइस नसल्याची ओरड उमेदवारांनी केली होती.
आठ विभाग आहेत यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. एखाद्याला आठही विभागात असलेल्या पोस्टची परीक्षा द्यायची आहे, तर त्याला ती मुभा देण्यात आली आहे. त्याला त्या आठही ठिकाणचे प्रवेशपत्रही देण्यात आले आहेत. उमेदवाराने कोणत्या जागेसाठी परीक्षा द्यायची हे ठरवण्याचा चॉइस त्याला दिला आहे.
न्यासा’ संस्थेमुळे गोंधळ
न्यासा’च्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते, त्याविषयी बोलताना टोपे म्हणाले की, मागच्यावेळी जी तारीख ठरवण्यात आली होती, त्या तारखेपर्यंत न्यासा’ने परीक्षेबाबतची जी तयारी करायला हवी होती ती केली नाही. त्याबाबत त्यांनी ऐनवेळी असमर्थता दाखवली होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली.