२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार
राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले, मात्र कॉलेज कधी सुरू होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. राज्यातली सर्व महाविद्यालये येत्या २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वाची सूचना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केली. मात्र कॉलेज सुरू करायचे वा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात आला आहे. कॉलेज सुरू करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाशी विचार विनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत.
लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश
५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीनिशी कॉलेज सुरू करायचे असल्यास स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सांगताना ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालये आणि स्थानिक प्राधिकरणाने पुढाकार घेऊन कार्यक्रम आखावा, असेही निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.