महाराष्ट्रमुंबई

शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; १० हजार कोटींची मदत जाहीर

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीनंतरही राज्य सरकारकडून मदत घोषित करण्यात विलंब होत असल्याचा आरोप करत सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता अखेर ठाकरे सरकारने (Thackeray Government) मदतीची घोषणा केली आहे. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.

महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कशी असेल मदत?

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर.
    दरम्यान, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *