ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यातील ‘या’बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू

२३ ऑक्टोबरपूर्वी राज्यातील ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे किंवा आतापर्यंत संपलेली आहे, तसेच ज्या बाजार समित्यांवर प्रशासक आहेत, अशा सर्व बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.

१० नोव्हेंबर रोजी संभाव्य मतदार यादी आणि निवडणुकांसाठीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी तसे आदेश दिले आहेत. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे बाजार समित्यांच्या निवडणुका २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. ३० सप्टेंबर रोजी शासनाने ही स्थगिती रद्द केली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने या निवडणुका घेतल्या पाहिजेत.

निवडणुकांसाठी ३० सप्टेंबर रोजी प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. तर ज्या समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत २३ ऑक्टोबरनंतर संपणार आहे, अशा समित्यांच्या निवडणुकांकरिता अर्हता दिनांक निश्चित करण्याबाबत स्वतंत्र आदेश प्रसृत केले जाणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम

प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप, हरकती १० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मागवण्यात येणार आहे. प्राप्त हरकतींवर २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत निर्णय होईल. अंतिम मतदारयादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १६ डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. १६ ते २२ डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. उमेदवार अर्जांची छाननी २३ डिसेंबरला होणार असून अर्ज माघारीसाठी २४ डिसेंबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत असेल. निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी १० जानेवारीला प्रसिद्ध होईल. मतदान १७ जानेवारी रोजी होणार असून मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे.

येथे होणार निवडणूक

नाशिक- पिंपळगाव- लासलगाव- नांदगाव- मनमाड- येवला- चांदवड- देवळा- उमराणे- घोटी- कळवण- दिंडोरी- सिन्नर- मालेगाव- सुरगाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *