देशनवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना निर्देश:कोरोना स्थितीमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची स्थिती पाहता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी प्रोटोकॉलला 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवलं आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रमुख आणि सचिवांना चिठ्ठी लिहीण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन न होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.


कोविड प्रोटोकॉल पालनामध्ये निष्काळजीपणा नको
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले की, कोविड 19च्या प्रकरणांमध्ये घट झाली असली तरी, मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे. जेणेकरून आगामी सण सावधगिरीने, सुरक्षित पद्धतीने आणि कोविड प्रोटोकॉलसह साजरा केला जाऊ शकतो. 
भल्ला पुढे म्हणाले की, “देशात कोविडची दैनंदिन प्रकरणं आणि एकूण रुग्णांची संख्या कमी होतेय. परंतु काही राज्यांमध्ये हा विषाणू स्थानिक पातळीवर पसरत आहे आणि कोविड -19 देशातील सार्वजनिक आरोग्यासाठी एक आव्हान आहे.”


सणांच्या वेळी काळजी घ्या
केंद्रांने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “ज्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील त्यामध्ये अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरून कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता टाळता येईल. जत्रा, सण आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकं जमल्यामुळे देशात कोविड -19 प्रकरणं वाढू शकतात.” 
गृह सचिवांनी सांगितलं की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक जिल्ह्यात संक्रमणाचं प्रमाण, रुग्णालये आणि आयसीयूमध्ये बेडची संख्या यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे.


जास्त संक्रमण असलेल्या ठिकाणी लवकर पावलं उचला
केंद्रीय गृहसचिव म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचं प्रमाण जास्त आहे, त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने त्वरीत पावलं उचलावीत जेणेकरून प्रकरणांमध्ये वाढ थांबवता येईल आणि विषाणूचा प्रसार नियंत्रित केला जाईल. 


“प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असेल असे संकेतही लवकर ओळखणं आणि प्रसार नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणं देखील महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्याचा उल्लेख 21 सप्टेंबर 2021च्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एडवायजरीमध्ये आहे,” असंही भल्ला म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *