बीड

ग्राहक आणि सभासदांच्या विश्वासावरच संस्था प्रगतीपथावर-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

पाचही संस्था प्रगतीपथावर याचा सार्थ अभिमान आहे

बीड दि.२७(प्रतिनिधी):- रोपटे लावणे सोपे असते मात्र त्या रोपट्याचे सचोटीने आणि पारदर्शकपणे संगोपण करून सांभाळणे अवघड असते. रोपट्यांचे वटवृक्षात रूपांतर ही बाब अभिमानास्पद आहे. आपल्या ताब्यात असणाऱ्या पाच संस्था आज प्रगतीपथावर आहेत.

आदर्श शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतपेढी, नवगण विनायक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था, श्री गजानन नागरी सहकारी बँक, श्री गजानन सहकारी सुत गिरणी, बीड तालुका खरेदी विक्री संघ या संस्था दिर्घकाळ चालवून लोकांचा विश्वास संपादन करणे हे कार्य कौतुकास्पद असल्याच्या भावना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये व्यक्त केल्या. ते आयोजित पाच संस्थांच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित होते. यावेळी सर्व संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असणाऱ्या पाच संस्थांची सर्वसाधारण सभा सोमवार दि.२७ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सर्वसाधारण सभा ऑनलाईन असतानाही मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि सभासद संस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये आणि ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ऑनलाईन बैठक असतानाही शेकडो सभासद जोडले गेले आहेत. ही सवय आता अंगिकारावीच लागणार आहे आणि ती अंगिकारली जात आहे. या पाचही संस्था प्रगतीपथावर आहेत. सर्व ग्राहक आणि सभासदांचा विश्वास हेच आमचे भांडवल आहे, दिर्घकाळ संस्था चालवून त्याचे वटवृक्षात रूपांतर होणे ही बाब अभिमानाची आहे. आपल्या गजानन बँकेला ‘अ’ दर्जा मिळाला ही आपल्यासाठी पारदर्शक कार्याची पावती आहे. चौसाळा व रायमोहा येथे पाडव्याला नविन शाखांचा शुभारंभ होत आहे. ग्राहकांना योग्य सेवा देवून त्यांना परवडेल असा व्यवहार करणे महत्वाचे आहे. लवकरच ऑनलाईन सेवा ही सुरू करणार आहोत. कोरोनाच्या संकटात आपण जवळचे अनेक सहकारी गमावले आहेत, याचे दु:ख आणि वेदना आपल्याला आहे. बँकेचे मुख्याधिकारी स्वामी यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आपण पाच लाखाचा निधी मदतस्वरूपात देत आहोत. गजानन सुत गिरणीची वाटचाल देखील प्रगतीपथावर आहे. २९ कोटीचे सुत निर्यात करण्याचा मान आपल्याला मिळाला आहे. वेगवेगळ्या धाग्याची निर्मिती करून स्पर्धेत टिकुन राहण्याचा आपला प्रयत्न आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. आपल्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी घरबसल्या शिक्षण घ्यावे त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. आठवी ते बारावीसाठी हे अ‍ॅप उपयोगी पडणार आहे असे त्यांनी म्हटले. तत्पूर्वी त्यांनी सर्व संस्थेचा आढावा घेतला. संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीत अहवाल वाचन प्राचार्य थिटे ए.एस., प्रा.कंधारे व्ही.एस., प्रा.जगदीश काळे, कार्यकारी संचालक विश्वनाथ काळे यांनी केले. प्रारंभी स्व.काकु-नानांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करून या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली.

यावेळी न.प.सदस्य डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह माधवराव मोराळे, दिनकर कदम, अरूण डाके, नानासाहेब काकडे, गणपत डोईफोडे, डॉ.राजा मचाले, एम.ए.राऊत, डॉ.दत्तात्रय आघाव, डॉ.मन्मथ अप्पा हेरकर, बँकेचे व्यवस्थापक महादेव क्षीरसागर, शेख मंजूर यांच्यासह सर्व संस्थेचे संचालक, सभासद उपस्थित होते. याप्रसंगी स्वामी यांच्यासह निधन झालेल्याना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली, सभेला प्रत्यक्ष संख्या कमी असली तरी ऑनलाइन जवळपास ४०० च्या पुढे सभासद हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले. शेवटी अरूण कळासे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *