विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर:मंत्री उदय सामंत यांची माहिती
तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या यासाठीच्या सर्व सीईटी परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंगळवारी सांगितले.
सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी राज्यभरातील ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी राज्यभरात २२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यापुर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला होता. मात्र, सीईटीच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, पुढील काही दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यापुर्वी सांगितले होते. त्यानुसार आज तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात MHT CET परीक्षेचं बनावट वेळापत्रक व्हायरल होत होतं. मात्र, आज खुद्द मंत्री सामंत यांनीच परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केलीय. एमबीए, एमएमएस, एमसीए, ए. आर्च, आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MHT CET 2021 परीक्षा घेण्यात येते. ही CET परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून या परीक्षेला आठ लाख 55 हजार विद्यार्थी बसणार आहेत.
सीईटी सेल महाराष्ट्राने MHT CET 2021 परीक्षेच्या तारखांचे नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आहे.
या CET परीक्षानंतर 1 नोव्हेंबरपर्यंत कॉलेज सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या परीक्षेच्या कालावधीत मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरु होतील, तर मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन परीक्षा 16, 17 व 18 सप्टेंबरला होणार आहे. या शिवाय, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ एज्युकेशन परीक्षा तीन ऑक्टोबर रोजी, तर फिजिकल एज्युकेशन परीक्षा 3, 4 ,5, 6, 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर एज्युकेशन जनरल परीक्षा 6 आणि 7 ऑक्टोबरला व बॅचलर ऑफ फाइन अर्ट 9, 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर रोजी लागणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केलेय. या परीक्षेला तब्बल आठ लाख 55 हजार विद्यार्थी बसणार आहेत.