ऑनलाइन वृत्तसेवाबीड

बीड जिल्ह्यात 33 महसूल मंडळात अतिवृष्टी:शेतपिकांचे प्रचंड नुकसान,सात तालुक्यात पावसाचा हाहाकार

बीड जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाने झोडपले. जोऱ्याच्या गडगडाटासह रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने सात तालुक्याात हाहाकार माजला आहे. या सात तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

नद्या पुन्हा एकदा तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. लघु आणि मध्यम प्रकल्पाला भरती आली आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. सिंदफणा, मण़कर्णिका नदीलाही पूर आला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 69.7 मि.मी.इतक्या पावसाची नोंद झाली असून गेवराई तालुक्यात सर्वाधिक 129.4 मि.मी.पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील 63 पैकी 33 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री पावसाने जोरदार बॅटींग केली. रात्रभर झालेल्या या पावसाने बीड जिल्हा जलमय झाला. अवघ्या काही तासात सात तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई, केज, शिरूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या भरून वाहत आहेत. पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. जोरदार पावसामुळे शेकडो एकर जमिनीवरील शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी छोटे बंधारे फुटले आहेत. मांजरा नदीलाही पूर आला आहे.

गोदावरीसह अमृता नदीही दुथडी भरून वाहत आहे. यामुळे गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क पुन्हा तुटला आहे. तर अमृता नदीला आलेल्या पुरामुळे गेवराई-शेवगाव राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. तसेच धोंडराई येथील हनुमान मंदिराला चारीही बाजुने पाण्याने वेढा घातला आहे. माजलगाव आणि मांजरा प्रकल्पात पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. बीड जिल्ह्यातील 33 महसूल मंडळात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. बीड तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. बीड व गेवराई तालुक्याच्या सिमेवरील हिरापूर येथील सिंदफणा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रचंड विसर्ग झाला असून पाणी पुलालगत वाहत आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेत पिकातही पाणी आल्याने जमिन वाहून गेली आहे.

सात तालुक्यात अतिवृष्टी


गेल्या 24 तासात जिल्ह्यात सात तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात 77.7 मि.मी., पाटोदा-85,आष्टी-78, गेवराई -129.40, माजलगाव-11, अंबाजोगाई-67.4, केज-59.8, परळी -4.1, धारूर-16.80, वडवणी-22.4 तर शिरूरकासार तालुक्यात 138 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात एकूण ६९.७० मि.मी. पावसाची नोंद झाल्याने शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

माजलगाव, मांजरात मोठी आवक सुरू


बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि मांजरा हे उच्च क्षमतेचे मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. माजलगाव धरण 71.92 टक्के भरले आहे. 41 हजार 200 क्युसेसची आवक सध्या धरणात सुरू आहे तर मांजरा प्रकल्पात 31.83 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिवंत पाणीसाठा 56.324 एवढा झाला आहे.

33 महसूल मंडळात अतिवृष्टी


जिल्ह्यात 24 तासात झालेल्या पावसाने दाणादाण उडाली आहे. शिरूरकासार तालुक्यातील रायमोह महसूल मंडळात तब्बल 159.5 मि.मी.पाऊस पडला तर तिंतरवणी महसूल मंडळात 155.8 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बीड 80.3, पाली ९४, म्हाळसजवळा ८२, नाळवंडी ८५, नवगण राजुरी १११, पिंपळनेर ७५.३, पेंडगाव ८९.५, नेकनूर ९०.८, थेरला ९४, अंमळनेर १४५, आष्टी ६८.३, कडा १२१.५, दौलावडगाव ७०.५, धामणगाव ११२.८, पिंपळा ७५.८, गेवराई १२३, मादळमोही १७९.८, जातेगाव १२१.८, पाचेगाव १०५.३, धोंडराई ७८.८, उमापूर १३४.८, चकलांबा १४९.३, सिरसदेवी ११४.३, रेवकी १३८, तलवाडा १४९, पाटोदा ८८.८, बर्दापूर ११७.८, केज ७७.५, विडा ७३.८, नांदूरघाट १०८ आणि शिरूर महसूल मंडळात ९८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे 14 लघू प्रकल्प ओव्हर फ्लो


दोन आठवड्यापासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे १४ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यात बीड तालुक्यात शिवणी, खटकळी, लोकरवाडी, वडगाव भंडारवाडी, ईट, जुजगव्हाण, मन्यारवाडी, मणकर्णिका, तर आष्टी तालुक्यातील पांढरी, वेलतुरी, सुलेमान देवळा व धामणगाव व पाटोदा तालुक्यातील इंचरणा आणि वडवणी तालुक्यातील मैंदा या लघु प्रकल्पाचा समावेश आहे. तसेच गोदावरी खोऱ्या अंतर्गतच्या परळी विभागातील ३२ प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने ही माहिती दिली.

सौताडा धबधबा

सौताडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी


पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र सौताडा येथील श्री रामेश्वर देवस्थान परिसरातील धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याचे पाणी पाहण्यासाठी जिल्हाभरातील पर्यटक रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सौताडा येथे दाखल झाले होते. मात्र पर्यटकांनी पाण्याजवळ जाण्याचा मोह टाळावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *