दिल्ली विधान भवनाच्या कक्षांत सापडले ऐतिहासिक भुयार:लाल किल्ल्यावर जाण्यासाठी भुयारीमार्ग
दिल्ली विधान भवनाच्या जुनाट कक्षांची साफसफाई करताना कर्मचाऱयांना विधान भवनाला ऐतिहासिक लाल किल्ल्याशी जोडणारे मोठे भुयार सापडले आहे. याच भुयारी मार्गाने ब्रिटिश सैनिक हिंदुस्थानी क्रांतिकारकांना गुपचूप अन्यत्र हलवायचे असा इतिहास आहे.
दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी विधान भवनात सापडलेल्या भुयाराची माहिती पत्रकारांना दिली.
ऐतिहासिक दिल्ली विधान भवनाबद्दल मी 1993 ला आमदार झालो त्यावेळी भरपूर काही ऐकले आहे, असे सांगून विधानसभा अध्यक्ष गोयल म्हणाले, दिल्ली विधानसभा भवनात भुयार असून ते लाल किल्ल्याशी भुयारी मार्गाने जोडल्याची माहिती मी ऐकली होती. त्यानंतर इतिहास जाणून घेण्यासाठी मी भुयार मार्ग शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यावेळेस मला यश आले नाही. आता साफसफाईच्या कामात आम्हाला भुयाराचे प्रवेशद्वार सापडले आहे. या भुयाराचा पुढचा मार्ग मेट्रोची कामे आणि सांडपाण्याच्या पाइप लाइन्स टाकताना नष्ट झाला असावा असे माझे स्पष्ट मत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.
आता इथे उभारणार क्रांतिकारकांचे तीर्थक्षेत्र
पूर्वाश्रमीच्या दिल्ली न्यायालयातील एका कक्षात हिंदुस्थानी क्रांतिकारकांना फाशी दिली जायची. ब्रिटिश देश सोडून गेल्यापासून तो फाशी कक्ष कधीच उघडला गेला नाही. आता मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही या कक्षाची पाहणी केली आहे. क्रांतिकारकांचे तीर्थक्षेत्र म्हणून हे भुयार आणि फाशी कक्ष दर्शनासाठी पर्यटकांसाठी उघडण्यात येणार आहे. इथे देशवासीयांना येऊन क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहता येणार आहे. पुढच्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी हा कक्ष दर्शनासाठी पर्यटकांना खुला करण्यात येईल, असे दिल्ली विधानसभा अध्यक्ष गोयल यांनी स्पष्ट केले.
ब्रिटिश काळात हे कोर्ट होते
ब्रिटिशांनी कोलकात्याहून आपली राजधानी दिल्लीला हलवली तेव्हापासून दिल्ली विधानसभा केंद्रीय मुख्यालय म्हणून वापरात होती. 1926 ला ब्रिटिशांनी या भावनांचे रूपांतर न्यायालयात केले. या कोर्टातून छुप्या भुयारामार्गे हिंदुस्थानी क्रांतिकारकांना कोर्टातून गुपचूप अन्यत्र हलवले जायचे. त्यासाठी या भुयारमार्गे कोर्ट लाल किल्ल्याला जोडले असावे, असा अंदाज गोयल यांनी बोलून दाखवला.