देशात करोनाची दुसरी लाट कायम:चार राज्यात लाखाच्या आत अॅक्टिव्ह रुग्ण-केंद्रीय आरोग्यमंत्री राजेश भूषण
नवी दिल्लीः देशात करोना व्हायरस आणि लसीकरणाच्या स्थितीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी माहिती दिली. देशात गेल्या आठवड्यात नोंद झालेल्या करोनाच्या नवीन रुग्णांपैकी ६९ टक्के रुग्ण हे फक्त एकट्या केरळमधील आहेत. करोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. अजूनही देशातील ४२ जिल्ह्यांमध्ये रोज १०० हून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. केरळमध्ये सर्वाधिक १ लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या ४ राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण १०,००० ते १ लाखादरम्यान आहेत. देशात गेल्या ९ आठवड्यांपासून करोनाचा पॉझिटिव्हीटी दर हा ३ टक्क्यांहून कमी आहे. देशातील ३८ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
देशात करोनावरील लसीकरण मोहीमेला वेग आला आहे. ऑगस्ट महिन्यात १८.३८ कोटी डोस देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये आपण रोज सरासरी ५९.२९ लाख नागरिकांना लस दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लसीकरणाला आणखी वेग आला आणि रोज सरासरी ८० लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा डोस दिला आहे. देशातील प्रौढ लोकसंख्येपैकी ५४ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशात १६ टक्के प्रौढ लोकसंख्येने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
सिक्कीम, दादरा आणि नगर हवेली आणि हिमाचल प्रदेशने आपल्या राज्यातील १०० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. मिझोराम, लक्षद्वीप, दमन आणि दीव, लडाख, त्रिपुरामध्ये ८५ टक्के लोकसांख्येला लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
प्रत्येक देश आपली लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षेच्या उद्देशाने काम करतो. ही उद्देश पूर्ण झाल्यानंतर इतर देशांना लसींच्या निर्यातीचा निर्णय घेतला जाईल, असं राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.