ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द करण्याचा हाय कोर्टाचा निर्णय

अकरावी प्रवेशासाठीची सीईटी रद्द करण्याचा निर्णय बॉम्बे हायकोर्टाने दिला आहे. अकरावीचे प्रवेश हे दहावीच्या गुणांनुसार करावेत असंही कोर्टाने म्हटलं आहे. बॉम्बे हायकोर्टात या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात हा महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.

महाराष्ट्र सरकारने अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आसीएसीच्या विद्यार्थिनीने ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्या वतीने बॉम्बे हायकोर्टात दाखल केली होती.

या याचिकेवर बुधवारी न्या. आर. डी. धनुका आणि न्याय. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्य सरकारनं दहावीची परीक्षा रद्द झाल्यानं अकरावी प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (सीईटी) घेणार असल्याचं जाहीर केलं.

दहावीचं मुल्यांकन कसं केलं जाईल याचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आलाय. मात्र, तरीही साल 2020-21 च्या शैक्षणिक वर्षावर आधारीत अंतर्गत मुल्यांकनावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी घेतली जाईल. आणि सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सध्याच्या परिस्थितीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. राज्यात अजुनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नाहीत. 11 जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध अजुनही कायम आहेत. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही, मग 21 ऑगस्टला तुम्ही ही सीईटी कशी घेणार?, विद्यार्थी प्रवास कसा करणार? तसेच सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरणही पूर्ण झालेलं नाही मग त्यासाठी काय तयारी केलीत? अशी विचारणा हायकोर्टाने केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *