महाराष्ट्रमुंबई

हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान:आठवडाभरात निर्णय

मुंबई: राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत करोनाच्या निर्बंधात काही जिल्ह्यांमध्ये शिथिलता देत असताना राज्यातील हॉटेल व्यवसायिकांना कोणताही दिलासा दिला नव्हता. यामुळे हॉटेल व्यवसायिक नाराज झाले होते. व्यवसायाच्या दृष्टीने हॉटेलच्या वेळा वाढवून देणे आवश्यक असल्याचे सांगत वेळा वाढवण्याची मागणी हॉटेल व्यवसायिक राज्य सरकारकडे करत होते. आज हॉटेल मालक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत हॉटेल व्यवसायाला निर्बंधातून सूट द्यावी अशी मागणी केली. त्यावर येत्या आठवडाभरात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल मालक संघटनांना सांगितले आहे.

मला लोकांची चिंता आहे, लोकांचा जीव महत्वाचा आहे, असे सांगत आपण सध्यातरी निर्बंधांवर ठाम असल्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केली. मात्र, हॉटेल मालक संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आठवड्याभरात परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे.

राज्यातील हॉटेल आणि रेस्टाँरंट व्यावसियांकाच्या इंडियन हॉटेल अँण्ड रेस्टॉंरंटंस असोसिएशन – आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपल्याला सर्व गोष्टी पुर्वी प्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनची मोठी गरज भासली. पुढे तिसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या वाढली, तर ऑक्सीजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सीजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेतला जाणार आहे.(साभार-म टा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *