गुण नोंदविण्याची मुदत संपली:बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकालानुसार विषयनिहाय गुण राज्य मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेली मुदत संपली आहे. आता विभागीय मंडळ व राज्य मंडळाकडून याची पडताळणी करुन 31 जुलैपर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. यात दहावीसाठी 30 टक्के, अकरावीसाठी 30 टक्के, बारावीसाठी 40 टक्के याप्रमाणे 100 टक्के गुणांनुसार निकाल लावण्यात येणार आहेत. निकाल तयार करण्याबाबत राज्य शिक्षण मंडळाने 5 जुलै रोजी सवीस्तर सूचनाही जारी केल्या होत्या.
निकाल तयार करण्यासाठी वेळापत्रकही निश्चित करुन देण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर निकाल समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यासाठी 14 ते 21 जुलै अशी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर काही कनिष्ठ महाविद्यालयांचे गुण नोंदविण्याचे काम बाकी राहिले होते. त्यासाठी पुन्हा गुण नोंदविण्यासाठी 24 जुलै पर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती.
आता यानंतर हे गुण भरण्यासाठी कोणतील मुदतवाढ देण्यात येणार नाही. आता विद्यार्थ्यांच्या निकालांची तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच निकाल घोषित होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.