मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पंढरपूरला रवाना:विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा होणार
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा होत आहे. या पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे या देखील आहेत. मुख्यमंत्री आपल्या मातोश्री या निवासस्थानावरुन दुपारी अडीचच्या सुमारास निघाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे स्वत:ही गाडी चालवत आहेत.
पंढरपुराचील विठ्ठल मंदिरात उद्या, मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री सपत्निक पूजा करणार आहेत. मुख्यमंत्री पुढील ८ ते ९ तासांमध्ये पंढरपुरात दाखल होतील असा अंदाज आहे. त्यानंतर मध्यरात्रीनंतर पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडणार आहे.
राज्यात करोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे पाळावा लागत आहेत. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोबत चालक घेणे टाळले आहे. मंत्रालयात जाताना देखील मुख्यमंत्री चालकाला टाळून स्वत: गाडी चालवतात. गेल्या वर्षी देखील मु्ख्यमंत्री ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात आले होते. तुफान पाऊस कोसळत असल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीची मर्सिडीज गाडी टाळत रेंज रोव्हर ही गाडी घेतली आहे. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात.
काल पासून मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अशात मुख्यमंत्र्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. मात्र राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊनच मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांचा आजचा प्रवास हा पावसाच्या परीस्थितीचा अंदाज घेऊनच निश्चित केला आहे.
आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे) आणि इंदुबाई केशव कोलते (वय ६०) हे महापूजा करणार आहेत. केशव कोलते हे गेल्या २० वर्षांपासून मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत.