राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज:13 जुलैपर्यंत अलर्ट
मुंबई : राज्यात दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार असून हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यासाठी १३ जुलैपर्यंत हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवार दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी वीज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
दरम्यान, साधारणत: दुपारी २ ते ७ या वेळेत वीज पडण्याचा धोका असल्या कारणाने पाऊस व वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक शेतीची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नदी किंवा नाल्या वरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.