देशनवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी विस्तार;शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात तयारी सुरू

नवीदिल्ली-मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार पुढच्या वर्षी होणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला जात असल्याचं बोललं जात आहे. 20 मंत्र्यांना उद्या पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी दिलीय. उद्याच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात तयारी सुरू झालीय. 


नव्या कॅबिनेटमध्ये 25 पेक्षा जास्त OBC मंत्री असणार आहेत. तर 10 दलित आणि 10 आदिवासी मंत्री असणार आहेत. तसंच सर्व राज्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारताच्या इतिहासातील हे सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. याशिवाय नव्या मंत्रिमंडळात महिलांनाही प्राधान्य देण्यात आलं आहे. 


महाराष्ट्रातून नेमक्या किती खासदारांना संधी मिळते हे उद्याच कळणार आहे, 2019 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीनंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचं चित्र आहे. 
शिवसेना, शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर लोजपा नेते रामविलास पासवान यांचं निधन झाल्याने मंत्रिमंडळातील त्यांचं पद रिक्त आहे. त्याशिवाय अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *