वटपौर्णिमा 24 जून रोजी:व्रतपजून, व्रतकथा आणि पूजनासाठी शुभ मुहूर्त
सन 2021 मध्ये 24 जून रोजी वट पौर्णिमा आहे. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. यंदा 22 जून रोजी या व्रताचा आरंभ आहे. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे,चला तर मग जाणून घेऊया व्रतपजून, व्रतकथा आणि पूजनासाठी शुभ मुहूर्त यांविषयी..
यमदेवांकडून सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते, तसेच आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. तो दिवस म्हणजेच वट पौर्णिमा.!!
तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते.
वटपौर्णिमा 24 जून 2021
पौर्णिमा प्रारंभः 24 जून 2021 रोजी पहाटे 3.32 पासून
पौर्णिमा समाप्तीः 25 जून 2021 रोजी रात्रौ 12.09 वाजेपर्यंत
संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांनी शक्यतो घरीच राहून वटसावित्री व्रताचरण करून पूजन करावे, असे आवाहन केले जात आहे.
वटसावित्री पूजन
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी. एका चौरंगावर तिची स्थापना करावी. व्रताचरणाचा संकल्प करावा. त्यानंतर देवतांचे आवाहन करावे. तुप, दूध, मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. पूजा झाल्यानंतर,
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
अशी सावित्रीची प्रार्थना करावी. यानंतर,
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
असे म्हणून नामस्मरण करावे.
वटसावित्रीची कहाणी
पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता.
शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहीत राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
यमराज आणि सावित्री
सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला भोवळ आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली.
यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले. तिसरे वरदान मागताना, मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.
यमराजाने नादात तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले.