दहावीचा निकाल जुलैमध्ये: मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू
दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आज 10 जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांना मूल्यमापन कार्यपद्धतीचे यू टय़ुबच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मूल्यमापन कार्यपद्धतीचे स्वतंत्र वेळापत्रक मंडळाने जाहीर केले असून या वेळापत्रकानुसार दहावीच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम 10 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या मूल्यमापन कार्यपद्धतीत शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावरील जबाबदाऱया निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत 7 सदस्यांची निकाल समिती स्थापन केली जाणार असून ही समिती मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकानुसार कामकाजाची रूपरेषा ठरवणार आहे.
तसेच निकालाचे परीक्षण व नियमन समितीमार्फत केले जाणार आहे. या कार्यवाहीत मुख्याध्यापकांवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून शाळा समितीकडून तयार करण्यात आलेला निकाल संगणकप्रणालीमध्ये नोंदवण्याची आणि मंडळाला निकाल गोपनीय पद्धतीने देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.
नियमित विद्यार्थ्यांचा नववीचा निकाल आणि दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन तसेच तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे विषयनिहाय गुणदान केले जाईल.
खासगी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पाचवी ते नववीच्या वर्गात प्राप्त झालेल्या गुणांचा आधार घेतला जाणार आहे.
मंडळाला चुकीचा निकाल सादर केल्यास शाळांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर शिक्षकांना विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करण्यासाठी 11 ते 20 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तयार केलेला निकाल समितीकडे सादर केला जाणार आहे. सर्व प्रप्रिया 30 जूनपर्यंत चालणार असून विभागीय व राज्य मंडळ स्तरावरची निकाल तयार करण्याची प्रक्रिया 3 जुलैपासून केली जाईल.