शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी समिती:बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची नियुक्ती
पुणे -जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी नव्याने सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.
त्यामध्ये सचिव तथा राज्य समन्वयक म्हणून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक केली आहे. ही समिती 5 जणांची असून, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह 3 सदस्य चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि वर्धा जिल्हा परिषदेचे सचिन ओंबासे हे सदस्य असणार आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, या संगणकीय प्रक्रियेसाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाकडे पाठवावे. शिक्षकांचे आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रिया राबविणे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषद/महाआयटी/एनआयसी/सी-डॅक या संस्थांची मदत घ्यावी. सॉफ्टवेअर तयार केल्यानंतर त्याची चाचणी करून प्रत्यक्षात वापर करावा, असा सूचना देण्यात आल्या आहेत.
सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी महिनाभराची मुदत आहे. त्यामध्ये शिक्षक बदलीमध्ये पारदर्शकता असावी आणि सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे सॉफ्टवेअर तयार करताना लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून, सर्व बाबींचा विचार करून समितीकडे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येईल. त्यानंतर तात्काळ शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात होईल.असे आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी सांगितले