१८ ते ४४ वर्षे वयाच्या लाभार्थ्यांना आता थेट लसीकरण केंद्रावर मिळणार लस:पण स्थानिक प्रशासनाचा निर्णय अंतिम
अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण थांबवण्यात आलं आहे. काही ठिकाणी ४५ वर्षांवरच्या नागरिकांचं लसीकरणही लसींच्या पुरेश्या साठ्याअभावी काही दिवस थांबवण्यात येतं. अशातच केंद्र सरकारने आता नवा निर्णय घेतला आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या लाभार्थ्यांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करुन लस घेण्यास केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे. मात्र, सरकारी लसीकरण केंद्रातच थेट जाऊन लस घेता येणार आहे. यामुळे लसींची नासाडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे.
केंद्र सरकारने सांगितलं की, ऑनलाईन नोंदणी केलेले काही लोक लसीकरणाच्या दिवशी डोस घ्यायला येत नाहीत त्यामुळे काही लसी वाया जातात. ज्या नागरिकांकडे इंटरनेटची सुविधा नाही किंवा स्मार्ट फोन नाही त्यांना अशा पद्धतीने नोंदणी करुन लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. मात्र, अशा प्रकारचं लसीकरण करण्याचा निर्णय हा संपूर्णपणे स्थानिक प्रशासनाचा तसंच संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाचा असणार आहे असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचं थेट लसीकरण केवळ सरकारी लसीकरण केंद्रांमध्येच करण्यास परवानगी असून खासगी केंद्रांवर अशा पद्धतीने लसीकरण करता येणार नसल्याचंही केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.