घरकामगार महिलांना राज्य सरकारकडून १५०० रुपये मदत:मात्र वयाची अट लागू
मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकारने घरकामगार महिलांना प्रत्येकी १,५०० रुपयांच्या मदतीचा हात दिला असला तरी ही मदत केवळ ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांनाच दिली जाणार आहे. परिणामी ६० वर्षांपुढील गरजू घरकामगार महिला सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.
‘महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळा’कडे नोंदणी झालेल्या घरकामगार महिलांना राज्य सरकारकडून १५०० रुपये मदत दिली जाणार आहे. शासन पातळीवर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र सरकारच्या निकषात १८ ते ६० वयोगटांतील नोंदणीकृत महिलांनाच मदत देण्याची अट घातली आहे. गेल्या कित्येक वर्षांत मंडळ निष्क्रिय असल्याने आधीच मंडळाकडे नोंदणी केलेल्या घरकामगार महिलांची संख्या कमी आहे. त्यात सरकारने वयाच्या अटीचा निकष लागू केल्यास अनेक गरजू महिला लाभापासून वंचित राहणार आहेत.
घरकामगार महिला संघटित क्षेत्रात काम करत नाही . या कामातून मिळालेल्या मोबदल्यातून बचत करणेही शक्य नसते. त्यामुळे वयाच्या साठीनंतर घरी बसून खाता येईल इतकीही बचत महिलांजवळ नसते. या महिलांना आयुष्यभर घरकाम करण्याशिवाय पर्याय नसतो. सरकार ६० वर्षांपुढील घरकामगार महिलांना मदत देणार नसेल, तर त्यांना किमान निवृत्ती वेतन देण्यात यावे’, अशी मागणी कष्टकरी घरकामगार संघटनेच्या मधु विरमुडे यांनी केली.