देशनवी दिल्ली

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिले सर्वाधिकार

नवी दिल्ली, दि. 18- करोना विरोधात लढा देणारे अधिकारी हे फील्ड कमांडर असून तेच भारताच्या करोनाच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्व करत आहेत. अधिकाऱ्यांनी जर आपापल्या भागातील व जिल्ह्यातील करोनावर नियंत्रण मिळवले तर देशभरातील करोना आपोआप नियंत्रणात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी आज देशातील काही राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या भागातील करोनाशी संबंधित बाबींची माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागातील करोनाचा प्रसार रोखण्याच्या संदर्भात त्यांनी विशेष भर दिला व अधिकाऱ्यांना काही टिप्सही दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जी काही पाउले उचलायची असतील ती उचलावीत. त्यांना माझ्याकडे पूर्ण मुभा आहे. मला सांगण्यासारखी काही गोष्ट अधिकाऱ्यांकडे असेल तर त्यांनी ती बिनदिक्कतपणे सांगावी. त्याचा संपूर्ण देशाला फायदा होईल असेही मोदी यावेळी म्हणाले.

कोविडच्या व्यतिरिक्त तुम्हाला नागरिकांच्या जीवन सुलभतेचीही अर्थात इज ऑफ लिव्हिंगचीही काळजी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्याला करोनाचा प्रसारही रोखायचा आहे आणि रोज लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठाही विना अडथळा सुरू ठेवायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की या सूसुत्रता यावी यासाठी आरोग्य मंत्रालय प्रयत्न करते आहे. राज्यांना पुढच्या पंधरा दिवसांची रूपरेषा अगोदर करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत तेवढीच वेगवेगळी आव्हानेही आहेत. एकप्रकारे प्रत्येक जिल्ह्याची स्वत:ची अशी काही आव्हाने आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासमोर असलेल्या आव्हानांची योग्य माहिती आहे. त्यामुळे जेव्हा तुमचा जिल्हा जिंकतो तेव्हा पूर्ण देश जिंकतो. जेव्हा तुमचा जिल्हा करोनाला पराभूत करतो तेव्हा पूर्ण देश करोनाला पराभूत करतो.’असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *