मुलांना संसर्ग झाला तर आई-वडील काय करतील?’,सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टात ऑक्सिजनच्या तुटवड्यावर गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने करोनाच्या तिसऱ्या लाटेवरून चिंता व्यक्त केली. करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. यात लहान मुलांनाही संसर्गाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आई-वडील काय करतील? केंद्र सरकारने काय नियोजन केले आहे? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने केला. तसंच लसीकरण मोहीमेत लहान मुलांचाही विचार केला पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं.
करोनाची तिसरी लाट येणार आहे. अशा परिस्थिती दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये. सरकारने देशभरात ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष दिले पाहिजे. ऑक्सिजनचे ऑडिट करून त्याच्या वितरणाबाबत पुन्हा एकदा विचार केला पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने केंद्राला सांगितलं.
करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्गाचा धोका आहे. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. यामुळे लसीकरण मोहीमेत मुलांचाही विचार करावा, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले. घरीच उपचार घेणाऱ्या नागरिकांना ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजनची आवश्यकता किती याचे आकलन रण्याची पद्धत चुकीची आहे. कारण आपल्याला संपूर्ण देशाचा विचार करायचा आहे. आपण आतापासूनच तयारी केली तर तिसऱ्या लाटेचा सामना ताकदीने करू शकू, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक आयसीयूचाही विचार केला पाहिजे. देशात १ लाख डॉक्टर आणि २.५ लाख नर्स असेच बसून आहेत. पण हे सर्व जण करोनाच्या तिसऱ्या लाटेत मोठी भूमिका बजावू शकतात. एक लाख डॉक्टर्स NEET परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारकडे यासंदर्भात काय नियोजन आहे? असा सवाल कोर्टाने केला.
आपल्याला करोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करून पुढे गेलं पाहिजे. आपण धोरण आखताना त्यात चूक कराल तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल, असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केंद्राला सुनावलं.