ऑनलाइन वृत्तसेवापुणे

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता:हवामान खात्याचा इशारा

काल पुण्यासह राज्यात अनेक शहरांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. गारपीटीमुळं राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्यातील शेतकरी एकीकडे कोरोना विषाणूशी झगडत असताना अस्मानी संकटाने त्यांना दुहेरी आघात केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. आजही राज्यात पावसाची स्थिती कायम असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

काल राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस झाला आहे.
वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी विजा पडल्यानं विविध ठिकाणी किमान 11 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एकट्या मराठवाड्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पुण्याजवळील भोर याठिकाणी वीज पडून दोन चिमूरड्या मुलींचा जीव गेला आहे. त्यामुळे या अस्मानी संकटात काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

आज जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहे. याठिकाणी तुफान वादळासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर हाताशी आलेल्या पिकाला वाचवण्यासाठी पिकांवर ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचं अवरण झाकण्याचा सल्लाही आपत्कालीन व्यावस्थापन विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *