तोपर्यंत ही IPLआमच्यासाठी संपणार नाही
करोनाच्या उद्रेकात IPL सीओओचा खेळाडूंना ‘खास’ संदेश
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अत्यंत गंभीर रूप धारण केले आहे. देशाची सद्यस्थिती पाहता, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळणारे बरेच खेळाडू खूप चिंतेत आहेत. या चिंताजनक परिस्थितीत ते आपल्या देशात कसे परततील याची त्यांना चिंता आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू ही स्पर्धा सोडण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. दरम्यान, लीग संपल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविणे ही बीसीसीआयची जबाबदारी आहे, असे आश्वासन आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) हेमंग अमीन यांनी खेळाडूंना दिले आहे. खेळाडूंनी मुळीच काळजी करू नये, असे त्यांनी सांगितले.
वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, आयपीएलच्या सीओओने सर्व परदेशी खेळाडू, सहाय्यक कर्मचार्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात सीओओने खेळाडूंच्या भीती आणि चिंता यावर भाष्य केले आहे. या पत्राद्वारे खेळाडूंना आश्वासन देण्यात आले आहे, की बीसीसीआयची ही स्पर्धा खेळाडू सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचल्याशिवाय संपणार नाहीत.
”आम्हाला माहित आहे, की आपणापैकी बरेच जण स्पर्धा संपल्यानंतर आपल्या घरी कसे पोहोचेल याबद्दल घाबरून गेले आहात, जे नैसर्गिक आणि समजण्यासारखे आहे. आम्ही आपल्याला खात्री देतो, की या संदर्भात आपण कशाचीही काळजी करू नये. आपण सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकता आणि याची काळजी बीसीसीआय घेईल”, असे या पत्रात म्हटले आहे.
बीसीसीआयने सर्व परदेशी खेळाडूंना आश्वासन दिले, की बीसीसीआय देशातील करोनामुळे परिणाम झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत खेळाडू सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचत नाही, तोपर्यंत ही स्पर्धा आमच्यासाठी संपणार नाही, अशी ग्वाही मंडळाने खेळाडूंना दिली आहे.