ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे पगाराबाबत नेमके काय झाले? :समन्वयाचा अभाव

मागील दोन महिन्यांपासून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे पगार उशिराने होत आहेत. या महिन्याची 20 तारीख उलटून गेली तरी अद्याप शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झालेला नाही. शालेय शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिले नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप शिक्षक भारतीने केला आहे.

मागील महिन्यात शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे वेळेत पैसे न मागितल्यामुळे पगार उशिरा झाले होते. मार्च पेड इन एप्रिल पगार न होण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी सांगितल्या जात आहेत.

मात्र या सर्वांचा फटका शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना बसत आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेक जण कोरोनाग्रस्त असून उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कर्जाचे हफ्ते थकले असून दंड, व्याज भरावे लागत आहे. या सगळय़ा परिस्थितीत शिक्षण विभाग मूग गिळून बसलेला आहे, असा आरोप शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केला आहे.