बीड

रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही म्हणून ओरड असताना मृत्यूचे प्रमाण कमी झाले

जाणीवपूर्वक वाढवला काळाबाजार?-अँडअजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) कोरोणा हे खरोखरच एक संकट आहे. यात शंका नाही. काळजी घेणे हाच एक पर्याय आता शिल्लक आहे. गेल्या आठ दिवसात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, म्हणून रुग्ण आणि नातेवाईक ओरडत असताना दुसरीकडे मृत्यूचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. यावरून खरंच रेमडेसीविरची गरज आहे का ? जाणीव पूर्वक काळाबाजार वाढवला आहे का ? हा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे हा विषय चिंता आणि चिंतनाचा झाला आहे, असे मत ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड.अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

रेमडेसिविर हेच इंजेक्शन कोरोणावर रामबाण इलाज असल्याचा भपका वैद्यकीय क्षेत्रात उठवला गेला. त्यातूनच काळाबाजार तेजीत आला. ज्या वेळी रुग्ण संख्या वाढत आहे, त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राने असा काळा बाजार करणे किंवा काळा बाजार होण्यासाठी मदत करणे, लज्जास्पद आहे. त्याचे परिणाम या क्षेत्राला आज ना उद्या भोगावे लागतील. नियती कोणालाही माफ करीत नसते, हे या लोकांनी मान्य करायला हवे.

दिनांक १० ते १९ एप्रिल २०२१ या दहा दिवसाच्या काळात सापडलेले रुग्ण आणि कंसात मृत्यु पावलेल्या रुग्णांचा आकडा पाहिला तर हे स्पष्ट दिसते. ही आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. दिनांक १० – रुग्ण ७६४ मृत्यू (८), दिनांक ११ – १०६२ (११), दिनांक १२ – ७०३ (५), दिनांक १३ – १०१८ (९), दिनांक १४ – ९२८ (७) दिनांक १५ – ९२८ (७), दिनांक १६ – १००५ (४), दिनांक १७ – १२११ (३), दिनांक १८ – ११४५ (०) आणि दिनांक १९ – ११२१ (९) याप्रमाणे ही आकडेवारी पाहिल्यानंतर मृतांची संख्या कमी झाल्याची दिसून येते.

ही आकडेवारी आम्ही प्रशासनाकडून घेतली आहे. दररोज आपण पेपर मध्ये वाचत असलेला आकडा आणि ही आकडेवारी पाहता दोन्ही मध्ये मोठी तफावत असल्याचे दिसते. वर्तमानपत्रात आपण वाचलेली आकडेवारी जर खरी असेल तर प्रशासन ती आकडेवारी लपवून कमी संख्या शासनाला का पाठवते ? हा देखील एक गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

रेमडेसीविर इंजेक्शन लागते की, नाही ? याबाबत आम्ही तज्ज्ञ नाहीत. मात्र रुग्णांची आकडेवारी आणि मृत रुग्णांचे प्रमाण याची तुलना केली तर जिल्ह्यात रेमडेसीविर इंजेक्शन नसताना मृत्यू कमी झाले आहेत. यावरून रेमडेसिविर इंजेक्शन ची खरच गरज आहे का ? हा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य लोकांना पडत आहे. मात्र याच वेळी हे इंजेक्शन घेऊ नका, असे आमचे म्हणणे नाही. पण वास्तव समोर आणण्याचा आणि भीती कमी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

कोरोना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कालपर्यंतची आकडेवारी पाहता चाळीस हजार चारशे चौतीस रुग्ण निघाले आहेत, तर कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या काल पर्यंत चौतीस हजार आठशे सतरा एवढी आहे. दुर्दैवाने यातील सातशे पन्नास रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाकीच्या रूग्णांवर आज रोजी इलाज चालू आहे. यावरून परिस्थिती घाबरण्या सारखी नाही, हे स्पष्ट दिसते.

ही आकडेवारी सांगण्यामागे आमचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे रुग्णाच्या मनातील भीती कमी करणे. रुग्णांनी आता रेमडेसीविरचं पाहिजे, असा विचार डोक्यात आणू नये. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राने खरोखर रुग्णसेवा करावी. जनतेमध्ये उत्साह वर्धक वातावरण निर्माण करून लूटमार थांबवावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रशासन आता आपली काळजी घेण्यात कमी पडत आहे. किंबहुना प्रशासनाचा वैद्यकीय क्षेत्रावर आजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळे आता रुग्ण संख्या वाढू नये. कोरोना आपल्या कुटुंबापर्यंत पोहचू नये. आपल्यापर्यंत पोहोचू नये, याची दक्षता नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. मास्क वापरावेत, गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोणा पासून दूर रहावे, असे कळकळीचे आवाहन अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.


  • प्रशासनाचा धाक राहिला नाही
  • रुग्ण आणि मृतांची संख्या पाहीली
  • रेमडेसीविरचा काळाबाजार थांबवा
  • जनतेने घाबरून जाणं चुकीचं ठरतंय
  • स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करा
  • मास्क,सॅनिटायझर वापरा,अंतर ठेवा