ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

केंद्राकडून महाराष्ट्राला 1121 व्हेंटिलेटर,कोरोनाच्या लढयात केंद्राचा हातभार

नवी दिल्ली – रेमडेसिविरचे उत्पादन आणि पुरवठा दुप्पट करून, ऑक्‍सिजनचा अंखंडित पुरवठा, करोनावरील औषध पुरवठ्याचा ओघ कायम ठेवून तसेच आरोग्य सुविधा वाढवून करोनाविरूध्द लढ्यात राज्यांना हवी ती मदत देण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.

देशातील लसीकरण मोहीमेबाबत केलेल्या उपाय योजनांची माहिती देताना ते म्हणाले, लहान राज्यांना लसीचा पुरवठा दर सात दिवसांनी पुर्ववत करण्यात येईल. तर मोठ्या राज्यांना हा साठा चार दिवसांनी पुर्ववत करण्यात येईल. लसींचा पुरवठा तातडीने पुर्ववत करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करण्यात येत आहेत. सप्टेंबरमध्ये कोव्हॅक्‍सिनचे जेवढे उत्पादन होत होते, त्याच्या दसपट उत्पादन केले जात आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या रुग्णालयात तात्पुरती हॉस्पिटल उभारण्यात येतील आणि राखीव वॉर्ड करोना बाधितांवर उपचारासाठी ठेवण्यात येतील. भारत सरकारकडून अतिरिक्त व्हेंटीलेटर्सचा पुरवठा करण्यात येईल. त्यात महाराष्ट्राला 1121, उत्तर प्रदेशला 1700, झारखंडला 1500, गुजरातला 1600, मध्य प्रदेशला 152 आणि छत्तिसगढला 230 व्हेंटिलेटर्स देण्यात येतील, असे ट्‌विटही त्यांनी केले आहे.

राज्यांच्या ऑक्‍सिजनच्या अतिरिक्त मागणीची दखल घेऊन त्यानुसार ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी वैद्यकीय ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवण्यात येत आहे, असेही हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.