खाजगी वापराचे ऑक्सिजन सिलेंडर रुग्णांच्या उपचाराकरिता देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती धारण करत आहे. आज रोजी बीड जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीय असून ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या या रुग्णांना ऑक्सीजन उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर संपूर्ण आरोग्य प्रशासन हे निकराने प्रयत्न करत आहे परंतु कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या, त्यांच्याकरिता उपलब्ध होणारा ऑक्सीजनचा पुरवठा,
सातत्याने वाढणारी मागणी आणि ऑक्सीजन साठवून ठेवण्याच्या कमी असलेल्या सुविधा या सर्व बाबींमुळे अति तातडीच्या वेळी जर एखाद्या ठिकाणी ऑक्सीजन पुरवठ्यामध्ये अडचण उद्भवली तर रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून राखीव साठा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राखीव साठा असलेले ऑक्सीजन सिलेंडर भरून ठेवणे ही आजची महत्वाची गरज आहे. तथापि जिल्हा प्रशासनाकडे आणि आरोग्य प्रशासनाकडे आज रोजी उपलब्ध असलेली ऑक्सिजन सिलेंडरची संख्या मर्यादित असल्याने बीड जिल्ह्यातील विविध औद्योगिक व्यापारी स्वरूपाच्या असलेल्या आस्थापनाकडे तसेच वैयक्तिक वापर असलेल्या खाजगी व्यक्तीकडे
असलेले सिलेंडर हे संबंधितांनी जिल्हा प्रशासनाकडे कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.
सदरचे सिलेंडर प्रशासनाकडे ताब्यात घेताना त्याची
पोहोच पावती संबंधितांना दिली जाईल व कोरोना रुग्णांच्या उपचाराचा कालावधी संपल्यानंतर
सदरचे ऑक्सीजन सिलेंडर संबंधितांना व्यवस्थित पद्धतीने परत करण्यात येतील. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची अत्यंत तातडीची आवश्यकता म्हणून जिल्ह्यातील सर्व नागरिक,
व्यापारी आणि उद्योजक यांनी आपले वापरात असलेले ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाशी संपर्क करून
तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत जाहीर आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे या अनुषंगाने संपर्का करिता तहसीलदार बीड श्री शिरीष वमने यांना मोबाईल क्र. 9960665222 वर
संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.