बीड

पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली बीड ग्रामीण हद्दीतील घटना

बीड :- शहरालगतच्या पांगरबावडी शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी समोर आली. सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन जणांचे मृ़तदेह बाहेर काढण्यात आले होते तर, तिसऱ्याचा शोध सुरु होता. तिन्ही मुले ही पेठ बीड भागातील रहिवासी आहेत.

ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार,शहरातील पेठ बीड भागातील ओम गणेश जाधव (१७, रा. गांधीनगर,बीड), श्याम सुंदर देशमुख (१७, रा. राजीव नगर) आणि मयूर गणेश गायकवाड (१४, रा. गांधीनगर) हे तीन मुले शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोहण्यासाठी खदाणीत गेले होते.

बीड शहरानजीकच्या पांगरबावडी परिसरात बायपास नगरी आहे. येथे जवळच एक खदान असून या खदानीत बऱ्यापैकी पाणी व गाळ आहे. तीनही मित्र दिवसभर ते तिथेच पाेहले; मात्र पोहताना गाळात फसून तिघांचाही बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना समोर आल्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.