वृत्तपत्रे विक्रेत्यांना दिलासा:राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही, असे स्पष्टीकरण सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील असंख्य वृत्तपत्रे विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लावण्यात आले. यातून वृत्तपत्रे विक्रेत्यांना वगळण्यात आले असतानादेखील मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. यासंदर्भात अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांनी तीक्र नाराजी व्यक्त केली होती.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्यकारी अध्यक्ष संजय चौकेकर यांच्याकडेदेखील तक्रार केली होती.
अखेर याप्रश्नी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांना कारवाई न करण्याचे सूचना केल्याचे कळते. शासनाच्या नियमावलीनुसार वृत्तपत्रधारकांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.