ऑनलाइन वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 899 रिक्त पदांसाठी भरती

मुंबई, 9 एप्रिल: महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत (Maharashtra Public Health Department) आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरती (Recruitment for Medical Officer Group A post) साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 899 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. जाणून घेऊयात या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सविस्तर माहिती.

एकूण पदसंख्या – 899

वेतनश्रेणी – सातवा वेतन आयोग (वेतनस्तर, एस-20 रुपये 56,100 – 177500) नुसार वेतन अनुज्ञेय राहील.

वयोमर्यादा – दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी प्रचलित नियमानुसार 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत नियमाप्रमाणे शिथीलक्षम.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

शैक्षणिक अर्हता

वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदासाठी – सांविधीक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 (1956चा 102) ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ट केलेली समान अर्हता.

वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदासाठी – सांविधीक विद्यापीठाची (4.1) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी / पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956चा 102) ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित विनिर्दीष्ठ केलेल्या समान अर्हततेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका.

31 मार्च 2021 या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास आंतरवासिता (Internship) पूर्ण असणारे उमेदवारच पात्र ठरतील.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – 1000 रुपये

मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 500 रुपये

या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करण्यारपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी आणि मगच आपला अर्ज दाखल करावा. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा.

अर्ज कुठे मिळेल?

वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फत अर्जाचा नमूना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अर्ज कुठे पाठवावा?

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्जाचा नमूना डाऊनलोड करुन सदरचा अर्ज पूर्ण भरुन अर्जासोबत आवश्यकत त्या सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकीत प्रती जोडून संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, मुंबई यांच्या नावाने त्या कार्यालयात हस्त बटवड्याने / नोंदणीकृत डाकने सादर करावा.