महाराष्ट्रमुंबई

कोरोना रुग्णवाढ:राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यात रोज कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोरोना बाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज विक्रमी आकडा समोर येत आहे. यात विशेषकरुन मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात आज 2 लाख 10 हजार सक्रिय रुग्ण असून 85 टक्के लक्षण विरहित आहेत.

तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 0.4 टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे.

लसीकरणाचा वेग वाढवणार : टोपे
आतापर्यंत राज्यात 45 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. रोज सरासरी 3 लाख लोकांचे लसीकरण होत आहे. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आता जिथे निवडणुका सुरू आहेत, गुजरातमध्ये आयपीएल मॅचेस सुरू आहेत तिथे गाईडलाईन्सची अंमलबाजवणी होत नाहीये. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे टोपे यांनी सांगितले. हाफकीनमध्ये लसीच्या निर्मितीला परवानगी मिळावी, आम्ही तिथे 17 लाख डोस तयार करू शकतो, असेही ते म्हणाले. कोविशीलडच्या 2 डोसमध्ये 45 ते 60 दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

जे लक्षणविरहीत रुग्ण आहेत, त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे. शिवाय सोसायटीतील सदस्यांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं आहे. संस्थात्मक विलणीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. सोबतचं 45 वर्षांखालील लोकांचेही लसीकरण होणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व स्थानिक प्रशासनाला नियमांची कडक अमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

..तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही : टोपे
मुख्यमंत्र्यांसोबत काल बोलणं झालं. जर कोरोना रुग्ण वाढत असतील तर काही शहरात लॉकडाऊन लावावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणण आहे. परिस्थिती बिघडली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत यावर चर्चा होईल. लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली 80 टक्के असेल तर इतर ठिकाणी 200 टक्के असल्याचे टोपेंनी सांगितले. खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुगांसाठी 80 टक्के खाटा ठेवण्यात येतील. डॅश बोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल. रुग्णाला उपचार मिळेल याला प्राधान्य असेल.