खासगी शाळांमधील मुलाखतीसह 3 हजार शिक्षक भरती एप्रिल-मेमध्ये होणार
पुणे – पवित्र पोर्टलंतर्गत खासगी शाळांमधील मुलाखतीसह शिक्षक भरती एप्रिल-मेमध्ये होणार आहे. यात 950 खासगी शाळांमधील 3 हजार पदे भरण्यात येणार आहेत.
पवित्र पोर्टलद्वारे 12 हजार शिक्षकांची भरतीची घोषणा केली होती. उमेदवारांची बऱ्याचदा झालेली आंदोलने, पवित्र पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे, धोरणात्मक बांबीवरील प्रलंबित निर्णय या अडथळ्यातून मार्ग काढत पाठपुरावा करत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्याला सतत प्राधान्य दिले आहे.
पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवायची गुणवत्तेवर आधारित शिक्षक भरती करण्यात आली. यात 5 हजार 970 उमेदवारांच्या शाळांमध्ये नियुक्त्यांसाठी शिफारस केल्या आहेत.
यातील अपात्र, गैरहजर या कारणामुळे 1 हजार 500 उमेदवार प्रत्यक्षात शाळांमध्ये रुजू होऊ शकले नाहीत. माजी सैनिकांच्या जागांसाठी पुरेसे उमेदवार मिळालेच नाहीत. यामुळे या जागा कन्व्हर्ट करण्यात येणार आहेत.
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणातून शिक्षकांच्या जागा भरण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. मात्र, यावर अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे काही जागांच्या भरतीला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दुसऱ्या टप्प्यात खासगी शाळांमधील शिक्षकांची भरती मुलाखती घेऊन करण्यात येणार आहे.
करोनामुळे या भरतीत अडचणी आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत उमेदवारांची यादी तयार करणे, मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करून मुलाखती घेऊन त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. आता शाळा बंद आहेत. त्यामुळे घाईघाईने भरती प्रक्रिया राबवूनही फारसा काही उपयोग होणार नाही. मुलाखतीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांना 2021-22 या शैक्षणिख वर्षात जूनमध्ये नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ संबंधीत शाळांमध्ये रुजू व्हावे लागणार आहे.